अभिजीत पोते, प्रतिनिधी, मुंबई | 7 जानेवारी 2024 : सत्ता ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मीटिंग घेण्यासाठी आणि भांडण्यासाठी नसते तर ती विकासासाठी असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. कॅबिनेटमध्ये भांडणं होत आहेत. आरक्षणावर मंत्री भांडत आहेत. कॅबिनटेमधील हे वाद चव्हाट्यावर येतात. मीडियासमोर ते येतात. राज्यात अनेक प्रश्न आहेत. पण हे सरकार आपल्याला आंदोलनात अडकवत असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पण टीका केली.
मग पाकिस्तानचा कांदा कसा चालतो?
त्यांनी केंद्र सरकारवर पण तोफ डागली. शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला तर आमचं निलंबन केलं गेलं. माझ्यासारखा संसदेत कोणाचा रेकॉर्ड नाही आणि यांनी मला निलंबीत केलं. संसदेत सगळ्यात जास्त काम मी करते कुणालाही विचारा असे त्या म्हणाल्या. एरवी हे लोक सगळ्यांना तुम्ही देशद्रोही आहात पाकिस्तानला जा म्हणतात मग यांना पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
प्रश्नचंद पार्टीला एक सवाल
आजचा भाजप हा भ्रष्ट आणि जुमलेबाज आहे. माझा प्रश्नचंद पार्टीला एकच सवाल आहे की तुम्ही तुमच्या लोकांवर आरोप झाल्यावर कारवाई करणार की नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ते भ्रष्टाचारी होते की नाही. तुम्ही स्वतः च्या राजकारणासाठी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेय अनेक आरोप 2014 मध्ये आमच्यावर लावले त्याच पुढं काय झालं. कोळसा घोटाळ्याचे आरोप आमच्यावर करण्यात आले. या 10 वर्षात त्याचं काय झालं, असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मी कुणालाही सोडणार नाही
पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका जबाबदार व्यक्तीला शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारण देखील चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या माणसाने पोलिसांना मारलं आता यशवंतराव चव्हाण असते तर तातडीने त्यांच्यावर ॲक्शन घेतली असते आजच्या मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घ्यायला हवी.आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पोलिसांना हात लावून दाखवा मी कुणालाच सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मंत्रालयात शुकशूकाट
शासन आपल्या दारीवर राज्य सरकार खर्च करत आहे. एक कोटी रुपये एका कार्यक्रमाला लावतात कशाला एवढा खर्च करतात. आज आपले मुख्यमंत्री कार्यक्रम घेऊन जातीचे दाखले वाटत आहेत हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. मंत्रालयात कधीही जा शुकशुकाट असतो. मंत्री कुठे जातात तेच कळत नाही. मंत्रालयात कोणी दिसत नाही, अशी टीका ही त्यांनी केली.