26 कोटींचा कारखाना 12 कोटीला घेतला, तनपुरेंचे पाय आणखी खोलात; काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Mar 02, 2022 | 6:55 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीचा फास अधिकच घट्ट आवळलेला दिसत आहे. तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना अत्यंत कमी भावात आणि कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

26 कोटींचा कारखाना 12 कोटीला घेतला, तनपुरेंचे पाय आणखी खोलात; काय आहे नेमकं प्रकरण?
26 कोटींचा कारखाना 12 कोटीला घेतला, तनपुरेंचे पाय आणखी खोलात; काय आहे नेमकं प्रकरण?
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  (Prajakt Tanpure) यांच्यावर ईडीचा (Enforcement Directorate) फास अधिकच घट्ट आवळलेला दिसत आहे. तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना (Ram Ganesh Gadkari mill) अत्यंत कमी भावात आणि कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 26 कोटी 32 लाख रुपये किंत असलेला हा कारखाना तनपुरे यांच्या में. प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो प्रोडक्टला फक्त 12 कोटी 95 लाखाला विकण्यात आला. याची खरेदी रक्कम 52 दिवसात भरणे बंधनकारक असताना 2010मध्ये ही रक्कम भरण्यात आली. त्यानंतर हा खरेदी व्यवहार पूर्ण झाला, असा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे तनपुरे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे.

नागपुर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 90 एकर जमीन तर अहमदनगर येथील 4.6 एकर जमीन ईडीने जप्त ‌केलीय. या कारवाई नंतर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नॉट रिचेबल आहेत. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मशिनरी शिफ्ट करत त्यातून प्राजक्त तनपुरे यांनी प्रसाद शुगर या खाजगी कारखान्याची उभारणी केली. अहमदनगर जिल्हयातील वांबोरी येथे हा कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्याची जमीन सध्या तक्षशिला सिक्युरीटीजच्या नावावर होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (mseb) गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

पदाचा दुरुपयोग?

प्राजक्त तनपुरे यांचे वडील आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आपल्या मुलाच्या कंपनीला हा कारखाना विकला तेव्हा ते एमएसईबीवर पदावर होते. त्यामुळे प्रसाद तनपुरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपकाच ईडीने ठेवला आहे.

देशमुखांकडून निधी घेतला

ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता अनेक तथ्य समोर आली आहेत. प्रसाद शुगर मिलने वापरलेला निधी दुसऱ्यांकडून घेण्यात आल्याचं आढळून आलं आहे. हा कारखाना खरेदी करण्यासाठी काही पैसा काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्याकडून घेण्यात आला होता. विशेष म्हणजे देशमुख हे राम गणेश गडकरी कारखान्याचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यात कार्यकाळात अनियमितता झाल्याचं आढळून आलं आहे. हा कारखाना खरेदी केल्यानंतर तेथील प्लांट तोडण्यात आला व मशीन नगरच्या वामबोरी येथे वसविण्यात आली होती, असं ईडीकडून सांगण्यात आलं.

प्राजक्त तनपुरेंवरील आरोप काय?

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना होता. हा कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ 13 कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे.

चुकीचं काहीच केलं नाही

या प्रकरणी प्राजक्त तनपुरे यांनी ‘मी काहीच चुकीचं केलेलं नाही. ईडीकडे मी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या मिलबाबत सुमारे 18 वर्तमानपत्रात जाहिराती होत्या. त्यानुसारच आम्ही निविदा प्रक्रियेत भाग घेतला. या प्रकरणाची चौकशी होत आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक बोलू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया दिलीय.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे पंचवीस हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. नंतर हा गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिलं आहे. त्या सहकारी साखर कारखान्यांनी ते कर्ज फेडल नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केलेत. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कवडीमोल भावात विकत घेतले. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.

संबंधित बातम्या:

लवासाप्रकरणी पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का केली, सोमय्यांचे 3 सवाल

Video : गाड्यांच्या हालचालीत रस्त्याच्या मधोमध खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! थरकाप उडवणारी दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम