बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 19 दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला. या मुद्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला. अभिनेत्री यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, त्याचा निषेध केला आणि माफी मागण्याचे आवाहन केले. तर सुरेश आण्णांनी माफी मागण्यास नकार दिला. आता आज प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते धस?
मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती. त्यांनी कराड यांचे विविध कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले.
‘सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच पसार करावा’ असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता.
शांतता ही माझी मुक संमती नाही
यापूर्वी करूणा मुंडे यांनी पण प्राजक्ता माळीविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने त्यांचे नाव घेतले त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यांचे हावभाव आणि वक्तव्यावरून त्यांना काय म्हणायचे आहे, असा थेट सवाल माळी यांनी केला. त्यांचे हे वक्तव्य बेताल आणि चारित्र्यहनन करणारे असल्याने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
तर या वक्तव्यानंतर दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडीओ बनवले गेले. चिखल फेक झाली. चारित्र्य डागळण्यासाठी वापर करण्यात आला, असे सांगत त्यांनी युट्यूब चॅनल्स आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली. त्यांनी समाज माध्यमांसाठी एक आचारसंहिता असावी अशी भावना व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीची वेळ
कालच त्यांनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आणि समाज माध्यमांना वेसण घालण्याची मागणी केली होती. सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने आता हा वाद पेटतो की येथेच त्यावर पडदा पडतो याविषयीचा खल सुरू असतानाच प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. या भेटीनंतर त्यांनी काय मागणी केली. त्याच्यावर त्यांना काय आश्वासन देण्यात आले हे लवकरच समोर येईल.