राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष सुरू असलेला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे हे 20 जुलैपासून उपोषणाल बसले आहेत. उपोषणाचा दिसरा दिवस आहे. सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ते ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते याचा कडाडून विरोध करत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मोठी खेळी केली आहे. राज्यात जेव्हा मराठा आणि ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरू असताना आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव यात्रा काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे या यात्रेला आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण दिलं आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. तसेच, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला होता, मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा देत मराठा समाजासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ यांनी विरोध करत जरांगे यांच्यावर टीका केलेली. दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू होतं, दोघेही एकमेकांवर एकेरी भाषेत बोलत खोचक अशा टीका करत होते ज्या अजुनही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसींमधून न देता वेगळे द्या आमचा त्याला विरोध नसल्याची छगन भुजबळ यांची भूमिका आहे. पण आता मराठा समाजाला सगेसोयऱ्यांची मागणीसाठी जरांगे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
I emailed and invited Shri @ChhaganCBhujbal to the आरक्षण बचाव यात्रा initiated by Vanchit Bahujan Aaghadi.
I have invited him to join me in Kolhapur on July 26, 2024 or at any time during the course of the Yatra.
I look forward to him joining the आरक्षण बचाव यात्रा. pic.twitter.com/j96eewEo73
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 22, 2024
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेत यामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली. आम्हाला विचारून तुम्ही त्यांना वचने दिली नसल्याचं पवार स्पष्ट म्हणाले. परंतु पवारांची मनधरणी करण्यात राज्य सरकारला यश आलं असून सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात काढणाऱ्या ओबीसी यात्रेचं छगन भुजबळ यांना निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे एकटे पडणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता जरांगे हे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.