मुंबई: राज्यातील आणि देशातील अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवीन नसते. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना क्वचितच घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. आंबेडकर यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. (prakash ambedkar on 3 month off for personal reason)
प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यातून त्यांनी ही माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.
आंबेडकर यांनी तीन महिने सुट्टीवर जाण्याचं कोणतंही कारण दिलं नाही. वैयक्तिक कारणांसाठी सुट्टीवर जात असल्याचं त्यांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. आंबेडकर यांनी व्हिडीओ शेअर करून हे सांगितलं. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं दिसून येत आहे. मग आंबेडकर सुट्टीवर का जात आहेत?, असा सवाल केला जात आहे. वंचितने पाच जिल्ह्यातील निवडणुकांमधून अंग काढून घेतले आहे का? त्यासाठी आंबेडकरांनी सुट्टी घेतली आहे का?, असे सवाल या निमित्ताने केले जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि महाराष्ट्रातील अनेक नेते सुट्टीवर जात असतात. परदेशात जात असतात. पण त्यांचं राज्यातील घडामोडींवर संपूर्णपणे लक्ष असतं. विशेष म्हणजे हे नेते निवडणुका झाल्यावरच जातात. निवडणुका सुरू असताना सुट्टीवर जात नाहीत. मात्र, आंबेडकर निवडणूक काळातच सुट्टीवर जात असल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. (prakash ambedkar on 3 month off for personal reason)
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
संबंधित बातम्या:
केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!
(prakash ambedkar on 3 month off for personal reason)