मुंबई: प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काहीच अडचण नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं. सामंजस्याचं राजकारण कोणी करणार नसेल तर एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येतील. वंचितला महाविकास आघाडीत येण्यास कुणाचाही विरोध नाही. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आमची चर्चा होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
वंचितलाही महाविकास आघाडीत जागा दिल्या जातील. अजून जागा वाटप झालेलं नाही. पण महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. या सरकारला आमचं आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आमच्या युतीचं जागा वाटप कसं झालंय? काय झालंय हे लवकरच कळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध सुधारतील का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही. शरद पवार दगा देतील, असं त्यावेळी सांगितलं गेलं.
पण आमच्याच लोकांनी दगा दिला. दुसऱ्याचं घर फोडून स्वतचं घर सजवण्याचं काम सुरू आहे. ही औलाद गाडण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेची वाटचाल प्रबोधनकारांच्या हिंदुत्वावर सुरू आहे. समाज सुधारणा करताना प्रबोधनकारांनी काहीवेळा कडवटपणाने भूमिका घेतली होती. तशी घ्यावीच लागते. तीच लाईन आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
भाजप आणि संघाचं द्वेषाचं जे राजकारण सुरू केलं आहे. त्यापेक्षा समाजव्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर येईल याची आम्ही मांडणी करत आहोत, असं आंबेडकर म्हणाले.