पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकटवले, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

| Updated on: Jul 16, 2023 | 4:08 PM

घटनाबाह्य सरकारच्या चहापानावर आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही. सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकटवले, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Follow us on

मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कलंकित आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, सपा आणि कम्युनिस्ट या सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित बैठक घेतली. घटनाबाह्य सरकारच्या चहापानावर आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही. सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अद्याप अनुदान मिळालं नाही. कापसाचे रेट खूप कमी झाले आहेत. कापसाचा साठा करून ठेवला आहे. अद्याप कापसावर कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. अतिवृष्टीचा संपूर्ण निधी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. एनडीआरएफचं अनुदान अद्याप मिळालं नाही. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला

गेल्या १३ महिन्यात १२५० च्या वर आत्महत्या राज्यात झाल्यात. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणं प्राथमिकता असेल. पण, राज्यभरातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. होस्टेलमधील विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. साने नावाच्या व्यक्तीने महिलेवर अत्याचार केला. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

 

त्या दंगली सरकार पुरस्कृत असल्याची शंका

रायगडावर एका युवतीचा खून झाला. पुण्यातही कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न केला गेला. नागपुरात मागच्या आठवड्यात गावठी कट्टे विकण्याचे प्रमाण नागपुरात सर्वात जास्त आहे. खून घडतात. सरकार पुरस्कृत दंगली घडल्या आहेत. अकोला, शेवगाव, संभाजीनगर, संगमनेर, कोल्हापूर, मालेगाव येथे दंगली घडल्या. या सर्व दंगली सरकार पुरस्कृत आहेत की, काय अशी शंका येत असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.

महसुल मंत्र्यांनी बदल्यांमध्ये व्यवहार केले आहेत. मित्तल टॉवरमध्ये बसून बदल्या केल्या आहेत. व्हॉट्सअपवरून राज्याचे महसूलमंत्री बदल्या करतात. तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे, असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं.