मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रीपद काढून टाकण्याचा इशारा दिला होता असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राणे यांच्या पीएमुळे हा सारा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण तापले आहे, त्यावर आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना थेट मंत्रीपद काढून घेण्याचा इशारा दिला होता, असा खळबळजनक दावा खासदार विनायक राऊतांनी केला आहे.
कणकवलीतील कार्यक्रमात विनायक राऊत यांनी केलेला हा दावा चर्चेत आला आहे. राऊतांच्या दाव्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खासगी सचिवानं अनेक लोकांना गंडा घातला असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतच्या तक्रारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्या आहेत.
त्यावरुन त्या पीएला तातडीनं काढण्याच्या सूचना मोदी यांनी राणेंना दिल्या आहेत, तसं नाही झाल्यास तुमचं मंत्रीपद काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला असल्याचा सांगण्यात आले आहे. विनायक राऊत यांच्या या गौप्यस्फोटावर मात्र नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
याशिवाय विनायक राऊत यांनी संसदीय कामकाजावेळच्या दोन प्रसंगावरुन राणे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.
गेल्या अधिवेशनात खासदार कनिमोळी यांनी इंग्रजीतून केलेल्या प्रश्नामुळे राणे बुचकळ्यात पडले होते, तेव्हापासून ते संसदेत गेलेच नसल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान याआधी जेव्हा केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचं उत्तर का दिलं, यावरुन ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीसुद्धा नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती.