मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. या सोहळ्या निमित्ताने मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर एकाच मंचावर येणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) मोदींचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आज संध्याकाळी मोदी आणि ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर एकाच मंचावर येत असल्याने हे दोन्ही नेते काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज संध्यकाळी 5 वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4.30 पर्यंत मुंबई विमानतळावर पोहोचणार आहेत. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर जाऊन स्वागत करायचं असतं. मात्र, उद्धव ठाकरे हे मोदींच्या स्वागताला जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्या ऐवजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे हे मोदींच्या स्वागताला जाणार नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. राज्यात गेल्या काही काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजप दरम्यान प्रचंड वितुष्ट आले आहे. त्यामुळेही मोदी आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथी निमित्ताने लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पहिलावहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आज सायंकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
राहुल देशपांडे यांना संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर समाजसेवेसाठीचा मास्टर दीनानाथ आनंदमयी हा पुरस्कार मुंबईचे डबेवाल्यांना देण्यात येणार आहे. तसंच सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकास देण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.