मुंबई | भोंदू बाबा (Proclaimed Baba) रेल्वेत स्टीकर्स लावून रेल्वेचं (Railway) विद्रपीकरण (disfigurement) करतात, शिवाय अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेकांना घोळवत ठेवतात, यांच्या या अशा पोस्टर्स चिटकवण्यामुळे रेल्वे अस्वच्छ तर दिसते, पण प्रवाशांचा मूडही खराब होतो. हे भोंदू बाबा आपला नंबर यावर लिहितात, पण रेल्वे यांच्यावर कडक कारवाई करताना दिसत नाही. अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा फक्त वाचण्यासाठीच ठेवायचा की अशा भोंदू बाबांवर कारवाई करण्यासाठी वापरायचा की नाही, हा देखील प्रश्न पडतो. लोकलमध्ये नजर फिरवली तिथे या बाबांचे स्टीकर्स दिसतात. भोंदूबाबांच्या फसव्या दाव्यांमुळे काही जण त्यांच्याशी संपर्क साधतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. त्यांना लूटण्यात येते. त्यांचा मानसिक, शारिरीक छळ करण्यात येतो. या प्रकाराला वेळीच आळा घातला, तर अनेकांचे जीवन वाचवता येऊ शकते. त्यामुळे करोडो मुंबईकरांना (Mumbaikar) तेव्हाच आनंद होईल जेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करण्यात येईल.
रेल्वे दिवसेंदिवस आपले कोच बदलतेय, प्रवाशांना प्रसन्न वाटावं म्हणून रंगसंगतीत बदल करतेय, पण हे भोंदूबाबा हा कोच मुतारीच्या भिंतीसारखा करुन टाकतात. या देशात अंधश्रद्धा आणि रेल्वेला नुकसान पोहोचवणाऱ्यांविरोधात कायदा आहे, याचा वापर करण्यात रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस कचुराई करताना दिसून येतात.
लव मैरिज, मनचाहा प्यार, वशीकरण, गृहकलेश. जादू टोना, विदेश यात्रा में रुकावट, गड़ा धन, शादी में अड़चन, रूटों को मनाना, कारोबार में बाधा, किया-कराया, पति-पत्नी से अनबन, सौतन व दुश्मन से छुटकारा आदि. यदि आपका पति, प्रेमी, बेटा या बेटी आपकी नही सुनता तो बाबा के पास है समाधान. असे फसवे दावे करुन हे बाबा सावज हेरतात. अगोदरच परिस्थितीने भांडावून गेलेला, निराशेच्या गर्तेत असलेला आणि मार्ग न सापडलेले अनेक जण या बाबांच्या जाळ्यात अलगद अडकतात.
हा संपूर्ण मजकूर अंधश्रद्धा पसरवणारा आहे. यात या बाबांच्या जाळ्यात किती तरुण पैशांनी आणि तरुणी कोणत्या प्रकारे फसवल्या जात असतील .याची कल्पना केली तरी अंगावर काटे येतात. अशा बाबांना रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे पोलिसांनी कारवाई करुन तात्काळ गजाआड करण्याची गरज आहे. हे मनात प्रत्येक मुंबईकरांना वाटतं, पण या भोंदूबाबांवर जेव्हा कारवाई होईल, तेव्हा कोट्यवधी मुंबईकरांना आनंद झालाशिवाय राहणार नाही.