मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Sanjay Raut) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या (Medha Somaiya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते. राऊत यांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचं सांगत मेधा सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत किरीट सोमय्या हेही उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी पोलिसांना प्रत्येक घटनेचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल आहेत. आता मी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचा एफआयआर नोंदवावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, राऊतांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्या यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.
किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या आज दुपारी नवघर पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोमय्यांनी मीडियाशी संवाद साधला. प्रो. डॉ मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात भादंवि 503, 506, 509 अंतर्गत एफआयआर रजिस्टर करावी. मेधा सोमय्या या 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राऊत यांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं आहे. सोमय्या परिवारावर दडपण आणलं. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे, असं सोमय्या म्हणाले. पोलिसांना चॅलेंज आहे. त्यांनी नौटंकी बंद करावी. एफआयआर दाखल करणार नाही, त्या पोलिसांवर कारवाई करणार असं पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले आहे. आता आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्याचा एफआयआर दाखल करून घ्यावा, असं सोमय्या म्हणाले.
राऊतांनी आमच्यावर 100 कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला. मी ठाकरे सरकारला आव्हान केलं की 100 पैशाचा घोटाळा तर दाखवा. राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. राऊतांविरोधात एफआयआर दाखल केला नाही तर मी पुढच्या आठवड्यात क्रिमिनिल डिफिमेशनची केस नोंदवणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राऊत यांनी सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा आहे. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असं राऊत म्हणाले होते.