आपण पुण्याचे पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. अर्थात चंद्रकांत पाटलांच्या बोलण्यातून अर्थ स्पष्ट निघतोय की, रोख सध्याच्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडेच आहे. मात्र काही तरी गडबड झाली हे लक्षात येताच चंद्रकांत पाटलांनी नंतर सारवासारव केली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शाब्दिक तोफा सुटल्याच.
पब, हफ्ता वसुली आणि डान्सबारला राजाश्रय चंद्रकांत पाटलांचाच होता असं मिटकरी म्हणालेत. तर पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटलांनी फक्त खुर्च्या गरम केल्या, असं सुरज चव्हाण म्हणालेत म्हणजे महायुतीतच शाब्दिक खटके उडाले. तर ज्या पुण्यातल्या L3 लिक्विड लिजर लाऊज पब मधला ड्रग्जचा व्हिडीओ समोर आला. त्या पब वर पतित पावन संघटनेनं दगडफेक करत तोडफोड केली मनसेनंही पबच्या बाहेर आंदोलन केलं. पब संस्कृती बंद करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
पुण्यात नुकतंच पोर्शे कारनं दारु नशेत अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडल्याचं प्रकरण समोर आलं. तरीही पुण्यात पहाटे 3-3 वाजेपर्यंत पब कसे सुरु राहतात, हे L3 पबमधला व्हिडीओ समोर आल्यावर स्पष्ट झालं. दोन अल्पवयीनं तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यात 2 तरुणी ड्रग्जचं सेवन करताना दिसत आहेत.
एका तरुणीच्या मोबाईलवर ड्रग्जच्या 2 कांड्या आहेत. हे व्हिडीओ शुटिंगही एका महिलेचं केलंय. त्या महिलेचा आवाज या व्हिडीओत रेकॉर्ड झालाय. पुण्यातल्या ड्रग्जच्या घटनेवरुन पुण्याचे काँग्रेसचे आमदार धंगेकरांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला. व्हिडीओत ड्रग्ज घेणाऱ्या तरुण तरुणींचा शोध घेत असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं. तर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना दिलेत.