मुंबई : अनेक लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केलं. मायक्रो ओबीसी ज्याच्या जातीचे पाचशे लोकं नाहीत. अशा २५ वर्षाच्या तरुणाला तिकीट देऊन बाळासाहेबांनी निवडून आणलं. त्याच्या समाजाला कोणी ओळखत नाही, त्यांना बाळासाहेबांनी आमदार केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. हिंदू समाज हा हिंदुत्वावर एक असला पाहिजे. असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित होतं. ते बाळासाहेबांनी खरं करून दाखविलं. एकाला खालच्या जातीचा दुसऱ्याला वरच्या जातीचा असं दाखवून देशाचं कल्याण होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेहमी विज्ञानाची उपासना केली.
कुठलीही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर मांडली गेली पाहिजे. हिंदू समाजातील काही रुढी, प्रथा, परंपरा विज्ञानावर आधारित नव्हत्या. त्याला विरोध करण्याचं कामही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा वारसा चालविला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेहमी विज्ञानाची उपासना केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. हिंदुत्व ही व्यापक संकल्पना आहे. ही संकल्पना देशाच्या मातीशी जुळलेली आहे. ही संकल्पना देशाच्या संस्कृतीशी जुळलेली आहे. जीवनपद्धतीशी जुळलेली आहे. हे सांगणार स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्वोच्च न्यायालयात हिंदुत्वाचा मुद्दा गेला तेव्हा हिंदुत्व काय हे न्यायालयानंही सांगितलं.
हिंदू ही शास्वत संस्कृती आहे. या भूमीवर हजारो वर्षांपासून चालत असलेली रीती, नीती आणि पद्धती आहे. ती नित्य नूतन आहे. ती पुण्यपुरातन आहे. हीच व्याख्या बाळासाहेब ठाकरे यांनी न्यायालयात सांगितली होती, याची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सावरकर यांचा ‘स’सुद्धा माहीत नाही, अशी टीकाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.