चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याच्या भेटीच्या बातम्यांनी महाराष्ट्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मूठ घट्ट करण्यासाठी राहुल गांधी विविध विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेणार आहेत. ही बातमी दिल्लीतून आली अन् यात उद्धव ठाकरे यांचंही नाव शामिल असल्याची माहिती समोर आली. राहुल गांधी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. असं झालं तर मातोश्रीवर येणारे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील पहिले नेते ठरतील. भाजप नेत्यांनी मात्र या भेटीवरून शंका उपस्थित केली आहे तर कुणी थेट इशाराच दिलाय.
तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या मातोश्री दौऱ्याआधीच आक्रमक पवित्रा घेतलाय. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानावरून राज्यातील जनतेची माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रात येऊ नये, असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये केल्याने भाजपमध्ये संतापाचं वातावरण आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही यावरून स्पष्ट भूमिका मांडावी लागली.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी इशाराच दिला. यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असं म्हटलं
त्यानंतर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय, अशी चर्चा सुरु झाली. मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ताणलेला वाद शमवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सावरकरांचा मुद्दा वगळून इतर मुद्द्यांवर भाष्य करणार, असं आश्वासन मिळालं. संजय राऊत यांनीदेखील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर हा वाद काहीसा शमला.
आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भाजप, शिंदेसेनेसहित राजकीय वर्तुळाच्या नजरा याकडे लागल्यात.