मुंबई : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांनी तिसरं लग्न केलं आहे. कझाखस्तानची 25 वर्षीय मॉडेल नाताल्या इलिनासोबत त्यांनी लगीनागाठ बांधली. मलबार हिल इथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला केवळ 25 पाहुणे उपस्थित असल्याचं बोललं जातंय. अत्यंत खाजगी पद्धतीने राहुल यांचा हा विवाह पार पडला.
राहुल महाजन यांनी लग्नाबाबत ‘मुंबई मिरर’शी बातचीत केली. “अगोदरचे दोन लग्न धुमधडाक्यात केले होते, पण ते नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे यावेळी कोणताही देखावा करायचा नव्हता. नाताल्याला एक वर्षांपासून ओळखत होतो आणि आम्ही एकमेकांना खुप चांगल्या पद्धतीने ओळखलं आहे. तिला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे आणि यामध्ये मी तिच्या सोबत असेल. फॅमिली लाईफसाठी मानसिक शांतता सगळ्यात महत्त्वाची असेल,” असं राहुल महाजन म्हणाले.
राहुल आणि नाताल्या यांच्या वयात 18 वर्षाचं अंतर आहे. राहुल यांचं वय 43 वर्षे, तर नाताल्याचं वय 25 वर्षे आहे.
राहुल महाजन हे बिग बॉसचे स्पर्धकही होते. त्यांचं पहिलं लग्न श्वेता सिंहसोबत झालं होतं. श्वेतासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न डिम्पी गांगुलीसोबत केलं. काही महिन्यातच डिम्पीने कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप करत हे नातं तोडलं. आता राहुल महाजन यांनी तिसरं लग्न नाताल्यासोबत केलं आहे.