मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. काल बैठका घेतल्यानंतर नार्वेकर हे आज ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटिसा पाठवणार आहेत. या 54 आमदारांना सात दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात येणार आहे. या आमदारांचं म्हणणं ऐकूनच नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागवणार आहेत. राजकीय पक्ष कोण हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना आजच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पुढील सात दिवसात भूमिका मांडण्यासाठी आमदारांना वेळ देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजकीय पक्ष कोण? हे तपासण्यासाठी राहुल नार्वेकर हे दोन्ही गटाच्या घटना तपासणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. तर ठाकरे गट हा पक्ष नसून एक गट ठरला आहे. त्यामुळे नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिल्यास ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही पक्षाला आम्हीच शिवसेना आहोत असा दावा करता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाने हाच मुद्दा अध्यक्षांसमोर रेटल्यास ठाकरे गटाला त्यातून दिलासा मिळू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यानुसार भरत गोगावले यांचं प्रतोदपद बाद केलं आहे. त्यामुळे कोर्टाने जो राजकीय पक्ष ग्राह्य धरला, तोच निकष या 16 आमदारांच्या कार्यवाहीत लावला तर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळू शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.