Railway नव्या तंत्राने प्रवाशांना शुद्ध पाणी पुरविणार

| Updated on: Jan 10, 2023 | 1:41 PM

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकावर आयआरसीटीसीने वॉटर वेंडींग मशिन बसविल्या होत्या, मात्र केंद्र चालकांना परवडत नसल्याने या वॉटर वेंडींग मशिन बंद पडल्या आहेत.

Railway नव्या तंत्राने प्रवाशांना शुद्ध पाणी पुरविणार
howitworks_step2
Image Credit source: howitworks_step2
Follow us on

मुंबई : प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी ( WATER ) मिळण्यासाठी  उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ( RAILWAY STATION ) मध्यंतरी आयआरसीटीसीच्या मदतीने वॉटर वेंडींग मशिन बसविल्या होत्या, मात्र या ‘स्वस्त आणि मस्त’ पाणी पुरविणाऱ्या मशिन बंद पडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेला मदत करण्यासाठी बीएआरसीच्या अणू ऊर्जा विभागाने पाणी शुद्ध करण्याचे नवे तंत्रज्ञान शोधून काढले आहे, यामुळे पाण्यातील विषारी क्षार शोधून दूर केले जातात.

पाणी निर्जंतूक करण्यासाठी तसेच फिल्टर करण्यासाठी बीएआरसीने पॉलीसल्फोन आधारीत अल्ट्रा फिल्ट्रेशन तंत्र शोधून काढले आहे.

बीएआरसीच्या या नव्या तंत्राने पाण्यातील मायक्रोबायलॉजिकल घटक, अशुद्धता, खारेपण, जडपणा, फ्लॉराईड, अर्सेनिक असे घटक शोषले जाऊन पाणी पिण्यासाठी अत्यंत शुद्ध केले जाते.

बीएआरसीच्या सहाय्याने रेल्वे या तंत्रज्ञानाच्या मदतीने BIS 10500 दर्जाचे पाणी तयार करणार आहे. हे पिण्यासाठी अत्यंत शुद्ध असल्याने रेल्वे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. ऊर्जा बचतीबरोबर कमी खर्चात हे शुद्ध पाणी तयार करण्याचे तंत्र बीएआरसीने देशाच्या 50 गावांमध्ये तपासले असल्याची माहीती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहे.

मध्य रेल्वेच्या चार महत्वाच्या स्थानकांवर एकूण 10 मशिन बीएआरसीच्या तंत्राने शुद्ध पेयजल पुरविण्याची योजना प्रायोगिक तत्वावर आखण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (1), सँडहर्स्ट रोड (1), दादर (4), लोकमान्य टिळक टर्मिनस (4) या स्थानकांवर दहा मशिन पहिल्या टप्प्यात बसविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बीएआरसीच्यावतीने केमिकल इंजिनिअरींग ग्रुपचे संचालक के.टी.शेणॉय आणि मध्य रेल्वेच्यावतीने वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांच्या नुकताच करार करण्यात आला आहे. त्यावेळी मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापक ईटी पांडे, डीसॅलिशन आणि मेम्ब्रेइन टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख ए.के.अदक, अतिरिक्त मुख्य अभियंते डॉ.अशोक उपाध्याय, डॉ.सौमित्र कार आदी उपस्थित होते.