मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshayari) यांना महाराष्ट्र सरकारच्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर राजभवनाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये राज्यपालांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही आपली बाजू स्पष्ट करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Raj Bhavan and CMO office clear their stands on plane denied controversy)
*महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड मसुरी येथे निघाले होते. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगतसिंग कोश्यारी होते. शुक्रवारी 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम नियोजित होता.
*त्यानुसार राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबईहून गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी देहरादूनसाठी 10 वाजता निघणार होते.
*या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपालांनी सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळविण्यात आले होते.
*त्यानुसार आज, 11 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपाल सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही.
*त्यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार, मुंबई येथूनच देहरादूनसाठी व्यावसायिक विमानाचं तिकीट तातडीने बूक करण्यात आलं. हे विमान दुपारी 12.15 वाजताचं होतं. त्या विमानाने ते देहरादूनला रवाना झाले.
राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते आणि मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात
‘इतका इगो असेलेलं सरकार राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही’, फडणवीसांचा हल्लाबोल
राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!
(Raj Bhavan and CMO office clear their stands on plane denied controversy)