मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते (Raj Thackeray criticize Modi Government over Farmer Protest barricading).
राज ठाकरे म्हणाले, “मी चायना किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरही इतका बंदोबस्त पाहिला नाहीये जितका शेतकऱ्यांसाठी केलाय. इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नाहीये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. ताणत ताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? 26 जानेवारी रोजी झालेली एक घटना काय घेऊन बसलाय?”
“शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन इतकं चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात. परंतु केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्य सरकारशी चर्चा करुन या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यात एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्राने या गोष्टींचा निर्णय घ्यायला हवा होता. हे प्रकरण इतकं चिघळण्याची आवश्यकता नव्हती,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय.
आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “वीज कंपन्यांना फायदा झाला नाही, नफा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर कसं होईल? पहिल्यांदा वीज मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वीज दरात कपात करु. नंतर एकदम घुमजाव झालं. मी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो.”
“शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएसईबी असेल किंवा टाटा असेल त्यांच्याशी शरद पवार बोलणार होते. मात्र, 5-6 दिवसांनी असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. त्यात चर्चा काय झाली माहिती नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात चक्काजाम
सचिन तेंडुलकरवरुन बिहारचं राजकारण तापलं, शिवानंद तिवारी यांचं वादग्रस्त वक्तव्य
Farmer Protest : ‘जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार’, राकेश टिकैत यांची घोषणा, 2 ट्रक मातीही मागवली!
व्हिडीओ पाहा :
Raj Thackeray criticize Modi Government over Farmer Protest barricading