लोकसभेपाठोपाठ आता राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याचं ठरवलं, अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका काय असेल? याची चर्चा होत आहे. मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी आजच्या भाषणातून आगामी निवडणुकीसाठीच्या मनसेच्या भूमिकेचा आराखडा मांडला आहे. महायुतीसोबत असणार की नाही याबाबत स्पष्ट भाष्य केलं नसलं तरी सव्वा २०० ते २५० जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे हा स्वबळाचा नारा आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग युती होईल का जागा मिळतील का. असा निर्णय मनात आणून नका. जवळपास सव्वा २०० ते २५० जागा लढवणार आहोत, असं राज ठाकरे म्हणालेत.
आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे, हे सर्व्हे असतो ना, पक्षातील एक चार पाच जणांची टीम केली आहे. तुम्हाला माहीत नसेल. ते तुमच्या तालुक्यात येऊन गेले. सर्व्हे झाला. पत्रकारांशी बोलले,. परत ते चार पाच दिवसात तुमच्याकडे येतील. तुम्हाला भेटतील. काय परिस्थिती आहे. ते सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकते. काय करता येऊ शकतं. याचा विचार करा. आकलन करा, अशा सूचना राज ठाकरेंनी मनेसच्या पदाधिकाऱ्यांना केल्यात.
निवडून येण्याची कॅपेसिटी असलेले , तयारी असलेल्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही. तुम्ही जे बोलाल, सांगाल, जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष येऊ शकले नाही. जे कुणी आहे, माहिती आहे. ती नीट माहिती द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे, असंही ते म्हणालेत.