मुंबई : चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात (Politics) आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. ते मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, की आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी, बिहारसारखं (UP, Bihar) राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉयझन देत आहेत. ते तिथेच छाटा, असे राज ठाकरे म्हणाले.
माझं भाषण, मुलाखतीत मी जे बोलतो त्याचे मुद्दे काढा. त्याचा प्रचार करा. लोकांना ते सांगा. फक्त आंदोलन करून चालत नाही. तुम्ही प्रमुख पदावर आहात. त्या पदाची शान राखा, असे ते म्हणाले. पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशलम मीडियात, फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, की निवडणुका कधी होतील माहीत नाही. अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील, असे वाटत नाही. नोव्हेंबर डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही लागतील. चिखल झालाय सगळा. कारण कोणी विचारणारा नाही. आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या. महापालिका तीन की दोन वॉर्ड? वॉर्डाला तीन माणसं चार माणसं. लोक काय गुलाम आहेत का, असा सवाल त्यांनी केला. त्यांना नगरसेवकही माहीत नसतात. चार चार माणसांचा प्रभाग करताय. खेळ मांडलाय नुसता. गृहित धरलंय लोकांना, असा संताप त्यांनी व्यक्त केला.