मुंबई | 20 जुलै 2023 : खालापूरच्या इर्शाळवाडीत काल रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. तर 34 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 15 तास उलटून गेले तरी अजूनही 150 लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या लोकांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. एक तर मुसळधार पाऊस, निसरडा रस्ता असल्याने घटनास्थळी वाहन नेता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जेसीबी पोहोचू शकली नसल्याने कोणतंही मदतकार्य करता येत नाहीये. परिणामी कुदळ आणि फावडे घेऊन मदतकार्य करावे लागत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवरून या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्या आहेत.
खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की, कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे यवर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, इरसालवाडी येथे दुर्घटना घडल्याने मुंबई महापालिकेने मदतीची कुमक पाठवली आहे. या घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून संयंत्र पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार, एकूण तीन बॉब कॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत. तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.
इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी सर्व यंत्रणा अलर्टवर आहे. एमएसईबीचे कर्मचारी देखील गावाच्या पायथ्याशी दाखल झाले आहेत. गावाच्या पायथ्याशी पोल स्ट्रीट लाईट उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. बचाव कार्य अडथळा येऊ नये म्हणून गावाच्या पायथ्याशी स्ट्रीट लाईट उभारल्या जात आहेत. बचाव आणि मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
810819555