नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते संघटनावाढीच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर आज राज ठाकरे नाशिकमधील वणी गडावर दाखल झाले. राज ठाकरे फनूनिक्युलर ट्रॉलीत बसून दर्शनासाठी रवाना झाले. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांनी देवीच्या चरणी मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली. यावेळी राज ठाकरेंसबोत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते.
दरम्यान अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. यामध्ये राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.
अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे जुने मित्र आहेत. या ओळीचं प्रेमात आणि आता विवाहबंधनात रुपांतर होणार आहे. मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. मिताली आणि राज ठाकरेंची मुलगी उर्वशी यांचीही चांगली मैत्री आहे. या दोघींनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
#नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सप्तश्रुंगी देवीचं दर्शन घेतलं @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/G9H3zxeHMl
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2018
राज ठाकरेंचा नाशिक दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 17 डिसेंबरपासून पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी ते इगतपुरी कोर्टात हजर झाले होते. परप्रांतियांना मारहाण केल्याच्या खटल्यात त्यांना जामीन मंजूर जाला. यानंतर राज ठाकरेंनी स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे.
राज यांनी पहिल्या दिवशी दिंडोरी कळवण चांदवड सटाणा येथे जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहाने राज ठाकरे यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांची मागील काळात जी क्रेझ होती ती पुन्हा बघायला मिळाली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट
राज ठाकरे यांची कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंनी कळवण आणि सटानामध्ये शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला. जे मंत्री ऐकत नसतील त्यांना कांदे फेकून मारा आणि मंत्री बेशुद्ध पडल्यानंतर तेच कांदे त्यांच्या नाकाला लावा आणि पुन्हा कांदे फेकून मारा, असं राज म्हणाले. मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही घाबरू नका आणि मी कांदा प्रश्नावर लवकरच मुंबईत शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे असे राज ठाकरे म्हणाले.
रेणुका मातेची आरती
राज ठाकरे यांनी 19 डिसेंबर रोजी चांदवडच्या रेणुका मातेचं मनोभावे दर्शन घेत आरती केली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरांसह मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रुग्णवाहिकेचं उद्घाटन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असताना काल त्यांनी नाशिकमध्ये एका रुग्णवाहिकेचे उदघाटन केले. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कैलास राजा मित्र मंडळातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुरू केली आहे. राज ठाकरे उपस्थित होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
20 डिसेंबर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला असताना ते 2 दिवसांपासून पदाधिकाऱ्यांच्या भेटीसह शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, 20 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपल्या 30 गाड्यांच्या ताफ्यांसह पेठ तालुक्यामध्ये ते दाखल झाले. पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी पेठला भेट दिल्याने संपूर्ण गाव मुख्य मैदानावर दाखल झालं होतं. यावेळी आपल्या भाषणात राज म्हणाले, कांद्याला 200 रुपयांप्रमाणे अनुदान हे मला मान्य नाही.
आमच्या गावचा विकास थांबला असून लोकं पैसे घेऊन मतं देतात असं एका शेतकऱ्याने राज ठाकरेंना सांगताच, पैसे घेऊन मत त्यांनाच द्यायचं असं असतं का ? असा टोमणा राज ठाकरेंनी लगावला. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असं करण्याचं सल्ला राज ठाकरे यांनी दिला. म्हणजेच पैसेही घ्या आणि त्यांना मतंही देऊ नका, असं राज म्हणाले.
याशिवाय मला सत्ता द्या मी तुमचे सगळे प्रश्न सोडवतो असं आश्वासन त्यांनी दिलं. पेठ दौरा आवरताच त्यांनी तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या घरी नाचणीची भाकरी, उडदाचं पिठलं याचा आस्वाद घेत, आदिवासी पद्धतीचं जेवण घेतलं.