मुंबईः मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Duri) यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर मनसेच्या नेत्यांच्या संकटात वाढ होताना दिसून येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या हेमंत पाटील यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे हे ठाणे, मुंबई या ठिकाणी हिंदूना भडकावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून ही गोष्ट करण्यात येत असल्याने ही घटना नियमबाह्य असून संविधानाला धरुन नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भडकावू भाषणामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हिंदू मुस्लिम वाद होण्याची शक्यताही होती, मात्र मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यात वाद झाले नाहीत. राज्य शांत ठेवल्याबद्दल आणि समाजात कोणतीही दुही माजवली गेली नाही त्याबद्दल हेमंत पाटील यांनी सर्व पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत.