मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचं निधन झालं. मंगळवारी (16 जुलै) सकाळी साडे पाचच्या सुमारास विक्रोळी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनाची माहिती मिळताच आंबेडकरी जनतेत दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला, अशी भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
बुधवारी (17 जुलै) दुपारी 12 वाजता विक्रोळीतील निवसस्थानाहून त्यांची अंतयात्रा निघेल. दादरमधील चैत्यभूमी येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
राजा ढाले याचां थोडक्यात परिचय
1940 मध्ये राजा ढाले यांचा जन्म झाला. राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि राजकारणी होते. त्यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने ‘दलित पँथर’ नावाची एक सामाजिक संघटना स्थापन केली. त्याअगोदर राजा ढाले हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) प्रमुख होते.