मुंबई : काही राज्यात मास्क सक्ती (Mask) करण्यात आल्याने आणि कोरोनाने (Corona Update) पुन्हा डोकं वर काढल्याने राज्य शासन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनीही सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली आहे. त्यानंतर राज्य शासनाचा पुढाचा प्लॅनही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितला. तसेच मास्कबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, असेही सांगितले आहेत. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्याप मास्कबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती आजच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मास्क घालावा असे आवाहन केले आहे. मात्र सक्तीचे नाही, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच कोरोना स्थितीचा आढावा घेतला, positivity rate 0.3 पासून 0.7 वर गेला आहे. आम्ही आकड्यांवर नजर ठेवून आहोत, असेही टोपे म्हणाले आहेत.
तसेच इतरही काही महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील बचत 250 कोटींची आहे.ती ज्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी नाही त्या 19 जिल्ह्यांना रक्कम देण्यात आलेली आहे, अशी माहिती टोपेंनी दिली. कॅन्सर आणि हृदयरोगांबाबच्या आजारांबाबत मोठ्या रकमेची तरतूद आज कॅबिनेटमध्ये दिलेली आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यातली सध्याची कोरोनाची आकडेवारी ही अजून तरी चिंता वाढवणारी नाही. त्यामुळे मास्कबाबत कोणताही मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही. जैसे थेच ठेवण्यात आलेले आहे. तसेच लसीकरण पूर्ण करण्यावर आणि बुस्टर डोस देण्यावरही शासनाकडून भर देण्यात येत आहे. संभाव्य धोका ओळखून शासन पुन्हा अलर्ट मोडवर येत कामाला लागले आहे.
आजच्या कॅबिनेटमध्ये ऊस उत्पादकांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पासून उसाचे जे कारखाने सुरू राहतील, यात वाहनं आहेत त्यांना 5 रुपये प्रतिटन अनुदान दिले आहे. तसेच 200 रुपये प्रतिटन उतारा देन्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच इंधन दरवाढी बाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असेही सांगितले. इंधन दरवाढीवरून मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते. आज याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र आज कोणताही निर्णय झाला नाही.