मुंबई: राणी बागेतील पेंग्विन आणि वाघांच्या इंग्रजी नावांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ आता भाजपच्या स्थायी समितीच्या सदस्या राजश्री शिरवाडकर यांनी या इंग्रजी नावावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. महापौर आत्यांनीच पेंग्विनची इंग्रजी नावं ठेवली आहेत, असा टोला भाजप नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या राजेश्री शिरवाडकर यांनी लगावला आहे.
महापालिकेतील दुर्मिळ प्राणी खरेदी करण्याच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या प्रसंगी राजेश्री शिरवाडकरही उपस्थित होत्या. मराठीच्या पाट्यावरून वाद सुरू असतानाच राणीच्या बागेतील प्राण्यांची इंग्रजी नावे ठेवण्यात आली आहे. त्याबाबत विचारले असता राजश्री शिरवाडकर यांनी थेट महापौरांवरच निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश महापौर आत्यांनीच केराच्या टोपलीत टाकला. एका प्राण्याचं नाव ऑस्कर ठेवलं ही कसली मराठी अस्मिता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश नाही तर फतवा काढला. पण त्यांच्या महापौर आत्यांनीच पेंग्विनची नाव इंग्रजी ठेवलीत, अशी खोचक टीका शिरवाडकर यांनी केली.
राणी बाग मुंबईत आहे की लंडनला? मराठीच्या नावावर मत मागणाऱ्या शिवसेनेच हेच मराठी प्रेम आहे का?, असा सवाल भाजपच्या स्थायी समिती सदस्य राजेश्री शिरवडकर यांनी महापौरांना केला आहे.
यावेळी मिहीर कोटेचा यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचीही पोलखोल केली. भाजपने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे 136 कोटी रु. वाचविले होते. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. 100 कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले, असं कोटेचा यांनी सांगितलं.
या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे निवृत्त उपायुक्त हे ‘भ्रष्टाचाराचे महामार्ग’ तयार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: