मुंबई/पुणे : माझी नाराजी माझ्या मतदारसंघाविषयी, तेथील प्रश्नांविषयी होती. ते सोडवण्याची खात्री दिल्याने मी राज्यसभा निवडणुकीत मतदान करणार आहे, असे आमदार दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite Patil) म्हणाले आहे. नाराज असलेले आमदार दिलीप मोहिते मिलींद नार्वेकरांच्या (Milind Narvekar) फोननंतर मतदानाला पोहोचले, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनीही त्यांना फोन केला होता. त्यानंतर मतदानाला येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांची नाराजी आहे. नाराज असून त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणेही झाले असल्याचे ते म्हणाले. मात्र तरीही मतदानाला आल्याचे ते म्हणाले. शेवटी मुख्यमंत्री सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच होत असतात. सगळ्या जनतेचे मुख्यमंत्री असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ज्या आमदारांच्या जीवावर सरकार चालते त्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर आम्ही आमची भूमिका मांडायची कोणाकडे, असा सवाल दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे.राज्याचे प्रमुख म्हणून माझी भूमिका मी त्यांना भेटून मांडलेली आहे. त्याचबरोबर माझ्या नेत्यांकडेदेखील ही भूमिका मांडलेली आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे, की मी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही आणि जाण्याचा प्रश्नही नाही. माझ्या तालुक्यातील जे काही विषय होते, त्यासंदर्भात गेलो होतो. मात्र माझे विषय सुटले नाहीत. जयंत पाटील त्याचप्रमाणे अजित पवार यांना भेटणार असून त्याप्रमाणे मतदान करणार असल्याचे ते म्हणाले.
मिलींद नार्वेकरांनी मला फोन करून सांगितले, की तुमचे सर्व प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी, आता कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. त्यानुसार मी तो ठेवला आहे. ते मला शंभर टक्के न्याय देतील, अशी मला खात्री आहे, असा आशावाद दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान असून विविध पक्षांतील नेते मदतानाला पोहोचत आहेत.