मुंबई : राज्यसभेच्या मतदानाला (Rajyasabha Election)आता अवघे काही तास उरले आहेत. या शेवटच्या तासातही मतांच्या जुळवाजुळवीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपची (BJP) पळापळ सुरू आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचा सपाटा लावला आहे. आपले आमदारही फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच ठेवले आहेत. त्यामुळे आता फाईव्ह स्टार हॉटेलावाल्यांनाही अच्छे दिन आले आहेत. आता मतदान घटिका जशी समिप येईल तशी बैठकांची लगबग सध्या सुरू आहे. विजयाचा दावाही दोन्ही बाजुने करण्यात येत आहे. राज्यसभेला सहा जागांसाठी सात उमेदवार झाल्याने हा सगळा खटाटोप सुरू आहे. सहावी जागा आमचीच म्हणत शिवसेनेने या जागेसाठी सर्वात आधी उमेदवार दिला तर दुसरीकडून भाजपही गप्प बसलं नाही, लगेच भाजपनेही धनंजय महाडिकांना संजय पवारांविरोधात मैदानात उतरवलं. त्यामुळे आता फोडाफोडी रोखण्यासाठी ही पळापळ सुरू आहे.
भाजपने आपल्या सर्व आमदारांची आणि पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही मुंबईतला ताज हॉटेलमध्ये घेतली आहे. या बैठकीला पाच दिवसात कोरोनापासून मुक्ती मिळवणारे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही पोहोचले होते. यावेळी भाजपने विजयाचा संकल्प करत महाविकास आघाडीविरोधात रणशिंग फुंकलं आहे. मात्र तिकडे महाविकास आघाडीला अपक्षांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपला खरा अंदाज लागणं कठीण झालंय.
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने आपले सर्व आमदार तसेच पाठिंबा असणारे अपक्ष आमदार हे ट्रायडंट मुक्कामी ठेवले आहेत. मात्र या ठिकाणी भाजपकडून घुसण्याचा प्रयत्न होत असल्याने आता याठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत खुद्द दाखल झाले आहेत. एवढेचं नाही तर ते आज रात्री ट्रायडंमध्येच आमदरांसोबत मुक्कामही करणार आहेत. कारण सेनेनेही कुठल्याही परिस्थिती संजय पवार यांचा विजय खेचून आणण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने स्नेहभोजनही ठेवलं आहे.
तर तिकडे राष्ट्रवादीनेही आपले आमदार सुरक्षित ठिकाणी…म्हणजेच हॉटेल ब्लू सीला मुक्कामी ठेवले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदावरी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची जागा जरी आरामात निवडून येत असली तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू आहे.
आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एवढा खटाटोप झाल्यावर काँग्रेस कसं मागे राहिलं? काँग्रेसनेही सभाव्य फुटाफुटीचा धोका ओळखून वेळीच आपले आमदार रेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. आमच्या चारही जागा निवडून येतील असे महाविकास आघाडीचे नेते हे फुल्ल कॉन्फिडन्सने सांगत आहे. तर भाजपनेही आपल्या विजयाचा दावा कामय ठेवला आहे. मात्र आता घोडं मैदान लांब नाही, गुलाल कुणाचा आणि कुणाचा बार फुसका निघणार हे चित्रही लवकच स्पष्ट होईल.