सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या यांनी काही दिवसांपूर्वी मास्क न घालण्याच्या आवाहन केले होते. पण मास्क न वापरणाऱ्या सर्व सामान्य लोकांवर जशी कारवाई होते. त्या पद्धतीने नेत्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. (Ramdas Athawale On Raj Thackeray Not wear Mask)
नुकतंच सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. “राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे,” असे रामदास आठवले म्हणाले.
“राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील,” अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी केली.
“अंबानी प्रकरणाकडे संशयाने पाहतो आहे. स्फोटकांच्या गाडीच्या मालकाचा मृत्यू देखील संशयास्पद आहे. ती आत्महत्या नसून हत्याच असावी. पोलिसांना काहीतरी माहिती त्या गाडी मालकाकडून मिळेल. म्हणूनच काही लोकांनी त्याची हत्या केली असावी. त्याबाबत या पोलीस अधिकाऱ्यावर संशय आहे. त्याची वागणूक संशयास्पद आहे. त्याची चौकशी केली जावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale On Raj Thackeray Not wear Mask)
राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मात्र नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते. (Ramdas Athawale On Raj Thackeray Not wear Mask)
संबंधित बातम्या :
राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार
VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना
मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?