मुंबई : मुंबईत राणा विरुद्ध ठाकरे (Rana vs Thackeray) असा संघर्ष शुक्रवार पाहायला मिळाला. मातोश्रीबाहेर (Matoshree) जाण्यासाठी राणा दाम्पत्यानं गनिमी कावा केला तर काय, यासाठी आधीच शिवसैनिक रात्रीपासूनच सज्ज झाले. रात्रीपासून खारबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. सकाळी घोषणाबाजीही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही (Police Security) केला गेला. दरम्यान, खार येथील प्रत्येक गाडी शिवसैनिकांकडून तपासली जाते आहे. शिवसैनिकांना राणा दाम्पत्य हे गाडीच्या डिकीमधून लपून बाहेर जाण्याचा संशय होता. त्यामुळे खार येथील राणांच्या घराबाहेरुन जाणाऱ्या प्रत्येक गाडीची डिकी महिला शिवसैनिकांनी तपासल्या आहेत. पोलिसांनी बॅरिकॅटिंगकरुन आधी तगडा पोलीस बंदोबस्त खारमध्ये ठेवलाय. दरम्यान, त्याआधी रात्रभर शिवसैनिकांनी पहारा दिलाय. त्यानंतर शनिवारी सकाळपासून वातावरण तापायला सुरुवात झाली.
दुसरीकडे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांसमोरची आव्हानंही वाढली आहेत. सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान पठन करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. त्यासाठी राणा दाम्पत्य हे शुक्रवारी अमरावतीवरुन मुंबईत दाखल झाले होते.
दरम्यान, शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानाला पूर्णपणे घेराव घातला आहे. खारमधील राणा ज्या ठिकाणी थांबले आहेत, त्या इमारतीला समोरुन आणि पाठीमागून दोन्हीकडून घेराव घातलाय. राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर कोणत्याही परिस्थिती मातोश्रीवर पोहोचू नये, यासाठी शिवसैनिकांनी वेढा दिला आहे.
एकीकडे खारमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मातोश्रीलाही छावणीचं स्वरुप आलं आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेटींग करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय.
मातोश्रीबाहेर जाऊन हनुपान पठण करु, असा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य हे शुक्रवारी मुंबईत दाखल झालं. शुक्रवारपासूनच नाट्यमय घडामोडी मातोश्रीबाहेर घडल्यात. संध्याकाळी मोहित कंबोज यांच्या गाडीवर कलानगर सिग्नलवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर भाजपनं या हल्ल्यावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर दुसरीकडे शुक्रवार रात्रीपासून शिवसैनिकांनी खार आणि मातोश्रीबाहेर खडापाहारा दिल्याचं चित्र पाहायला मिळालंय.