मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे सभागृहात झाला. मात्र या सभागृहाच्या निमित्ताने एक अनोखा योगायोग समोर आला.
या सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचा फलक आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराचं स्वागत थेट शरद पवारच करत असल्याचा विरोधाभास या फलकाच्या निमित्ताने दिसून आला. ज्या फलकावर स्वागतोत्सुक म्हणून शरद पवारांचं नाव आहे, त्याच ठिकाणी मोहिते पाटील समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहेत.
शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. गरवारे क्लब हा एमसीएचाच भाग आहे. गरवारे क्लबचं अध्यक्षपद पवारांकडे आहे. त्यामुळेच स्वागतोस्तुक म्हणून अध्यक्षांचं नाव बोर्डवर लिहिलेलं आहे. मात्र ज्या सभागृहात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या कार्यकर्त्याचा प्रवेश भाजपमध्ये होत आहे, त्याच सभागृहात हा विरोधाभास दिसून येत आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीकडून माढ्याची उमेदवारी मिळणं अशक्य असल्याने, रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.