मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे (Rashmi Thackeray become Saamana Editor). रश्मी ठाकरे यांच्या या नियुक्तीसह त्यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे आता स्पष्ट झालं आहे.
‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी होती. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकारी संपादक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच ‘सामना’ची जबाबदारी पेलली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 रोजी ‘सामना’ या दैनिकाची सुरुवात केली. पाच वर्षांनी हिंदी भाषेत ‘दोपहर का सामना’ सुरु करण्यात आला. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना वेळोवेळी आपल्या भूमिका मांडत आली आहे. सडेतोड टीकेपासून स्तुतिसुमनांपर्यंत विविधांगी अग्रलेख ‘सामना’त वाचायला मिळतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना ‘सामनाचे संस्थापक संपादक’ असं पद बहाल केलं.
रश्मी ठाकरे कोण आहेत?
रश्मी ठाकरे या सक्रीय राजकारणात थेट सहभागी नसल्या तरी त्या शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होत आल्या आहेत. अनेकदा शिवसेनेच्या मंचावरही त्या दिसल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना लाभाचं पद म्हणून सामना संपादक पद सोडावं लागलं. आदित्य ठाकरे यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने तेही लाभाचे पद असल्याने सामानाचे संपादक पद घेऊ शकत नव्हते. तेजस ठाकरे यांचे वय लहान आहे, त्यांना अजून तितकासा अनुभव नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्तीकडेच हे पद असावे असा विचार करुन रश्मी ठाकरे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. रश्मी ठाकरे यांची नेहमीच शिवसेनेच्या राजकीय भूमिका ठरवण्यामागे पडद्याआड महत्वाची भूमिका राहिल्याची शिवसेनेत आणि राजकारणात दबक्या आवाजात चर्चा होत असते. आज मुखपत्र सामानाच्या संपादक पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
Rashmi Thackeray become Saamana Editor