Ratan Tata Passed Away : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला, अशी प्रतिक्रिया सध्या उमटताना दिसत आहे. रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्माशनभूमीत शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केला जाणार आहेत.
रतन टाटा यांची रविवारी रात्री प्रकृती बिघडली. त्यांना रविवारी रात्री उशिरा रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. यानंतर रतन टाटा यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही. त्यामुळे कोणीही कोणतीही चुकीची माहिती पसवरू नये,” असे रतन टाटा यांनी म्हटले होते.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
रतन टाटा यांचे ब्लड प्रेशर कमी झाले होते. यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडली होती. रक्तदाब कमी झाल्याने त्यांची तब्येत खालवत गेली. रक्तदाब कमी झाल्यानंतर शरीरातील अवयव निकामी होत गेले. त्यातच रतन टाटा यांना डिहायड्रेशनही झाले होते. यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.