रत्नागिरी: संपूर्ण गाव झोपेच्या स्वाधीन होत असतानाच रात्री साडे नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं आणि 21 जणांचा जीव गेला. 2 जुलै 2019 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. हे धरण नेमकं कशामुळे फुटलं? याचं उत्तर अद्यापही मिळू शकलेलं नाही. पण आता हे धरण नव्यानं बांधलं जाणार आहे. भूगर्भतज्ज्ञांकडून या धरणाची पाहणीही करण्यात आली आहे. (Tivre dam to be rebuilt, survey by geologists)
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणफुटीच्या घटनेला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसंच आता या धरणाच्या पुनर्बांधणीच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. भूगर्भतज्ज्ञांकडून नुकतीच या धरणाची पाहणी करण्यात आली आहे. अजून एक तपासणी होणार असल्याचीही माहिती मिळतेय. मात्र हे धरण मातीचं न होता पक्क व्हावं, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
कोकणातील तुफान पावसाने 2019च्या जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून नेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
चक्क धरणच फुटल्याने परिसरातील ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. घरं वाहून गेली, प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली होती. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली होती.
तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा अजब दावा तत्कालीन जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. “धरण जवळपास 2004 साली कार्यान्वित झालं होतं. 15 वर्षांपासून त्यात पाणी साठतं. पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती. तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातूनच गळती सुरु झाली. ही बाब गावकऱयांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीही केली. ही दुर्घटना दुर्देवी म्हणाले लागेल. पाण्याची पातळी 8 तासांत 8 मीटरने वाढली होती”, असं वक्तव्य तत्कालीन जलसंधारणमंत्र्यांनी केलं होतं.
फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.
संबंधित बातम्या:
Tivre dam to be rebuilt, survey by geologists