मुंबई : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोगेश्वर येथील हॉटेल संदर्भात तक्रार केली होती. मुंबई महापालिकेच्या भूखंडावर हॉटेल बांधताना परवानगी घेण्यात आली नव्हती, असा सोमय्या यांचा आरोप आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याची तक्रार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे करण्यात आली. रवींद्र वायकर यांची पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बाहेर आल्यावर रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. त्यात कोणतंही तथ्य नाही. मागच्या वेळी बोलावलं होतं. पण, अधिवेशन सुरू होतं. त्यामुळे वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे आज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आलो. संबंधित आरोप किती खोटं आहे, हे मी त्यांना सांगितलं.
साडेअकरा पावणे बाराला मी आलो. तेव्हापासून पाच तास चौकशी झाली. मला जे सांगायचे होते, ते मी सांगितलं. यामध्ये माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे अतिशय खोटे आहेत. एखादा व्यक्ती विकृत असेल, तर त्याला लिंग पिसाटचं म्हटलं पाहिजे. असा आरोपही वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला.
सोमय्या हे खालून वरच्या अधिकाऱ्याला फोन करतात. यावरून तो व्यक्ती किती विकृत असेल हे कळते. हा व्यक्ती विनाकारण लोकांना त्रास देतो. हा व्यक्ती दुसऱ्या पक्षातील लोकांवर आरोप करतो. तो त्यांच्या पक्षात गेला की, निरमा पावडरसारखा धुऊन स्वच्छ होतो. पण, मी त्यापैकी नाही, असं वायकर यांनी स्पष्ट केलं.
मी एकनिष्ठ बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमची निस्सीम भक्ती आहे. मला जेवढं त्रास देता येईल, तेवढं तो व्यक्ती त्रास देतो. पण, मी कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं आहे. १९९१ च्या जीआरप्रमाणे बांधकाम केलं आहे. माझ्या क्लबसारखे अनेक क्लब बांधण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने जागा दिली. कायद्याच्या चौकटीत राहून बांधकाम केलं आहे, असं स्पष्टीकरण वायकर यांनी दिलं.
नवीन नियमावलीने मुंबई मनपा आयुक्तांनी मान्यता दिली. त्या नियमानुसार मी काम केलं आहे. तरीही आयएएस अधिकारी बदलले आहेत. माझी बाजू सत्याची असल्याने मी कोर्टात गेलो असल्याचंही वायकर म्हणाले.