मुंबई: सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे त्यामध्ये शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी या मागे कोणती तरी मोठी शक्ती असल्यामुळे हे सगळ घडतं आहे अस म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतकं धाडस करणार नाही. भविष्यात त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे समोर येईल असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadase) यांनी कल्याणामध्ये केलं. कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी खडसे बोलत होते.
सत्काराच्या कार्यक्रमादरम्यान एकनाथ खडसे यांनी माझ्या मागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचे काम तुम्ही केलं आहे. मी राज्याचा आमदार आहे कधी ही मला बोलवा मी येईन. येत्या काही महिन्यात महिन्यातून एकादा एक दिवस कल्याणमध्ये तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रमाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जमिनीचे आरोप झाले. इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही, मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात मी पहिल्यांदा अनुभवलं असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होतं, नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला गेला. माझा जावयी, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी त्यांच्या मागे चौकशी लावण्यात आली. सगळ कुटुंब आठवड्याला इडी कार्यालयात बसते. मी काय गुन्हा केलाय, कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना ? असा भावनिक सवालही त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते सिज केलं. आता पैसे काढून टाकले, त्यानंतर राहते घरं 10 दिवसात खाली करण्याची नोटीस देण्यात आली असा नाथा भाऊने काय गुन्हा केला होता. त्यानंतर न्यायालयातून जावून यावर स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं असंही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, करायचं असतं तर अनेकांना मला छळता आलं असतं, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो दुर्दैवाने असा विचार मी करत नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी त्यांनी न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत, नाही तर संपूर्ण कुटुंब आज तुरुंगात असते. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली, नाही तर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता असं भावनिक होत आपले मत व्यक्त केले.
गेल्या 40 वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलं आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत तर अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे. यामध्ये अस चित्र दिसतंय की एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्या निर्णय नुसार या तांत्रिक बाबींची सोडवणूक झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.