मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण यांच्यासह 4 आमदारांनी पक्ष बदल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच 5 विद्यमान आमदारांनी लोकसभा निवडणुकीत खासदारकी मिळाल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. हे राजीनामे आज विधीमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा, जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा, अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारकीचा आणि सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विखे भाजपमध्ये, क्षीरसागर शिवसेनेत, धानोरकर काँग्रेसमध्ये गेले. अनिल गोटे यांनी मात्र, स्थानिक पातळीवर स्वतःचीच आघाडी उघडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त भाजपचे नेते आणि आमदार प्रताप चिखलीकर, गिरीश बापट, उन्मेष पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले. शिवसेनेचे नेते हेमंत पाटील आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही खासदारकी मिळाल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
राज्य मंत्रीमंडळ विस्तारात अनेक आयारामांना मंत्रीपदाची संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रीमंडळ विस्तार करत अनेक आयारामांना मंत्रीपदाची संधी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपमधून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला. काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादीला रामराम करत शिवबंधन घातलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार आहेत. ती दोन्ही मंत्रिपदं राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांनाच मिळणार आहेत. तानाजी सावंत यांनी 2015 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.