विधान परिषदेत पारडं जड कोणाचं..? राज्याचं लक्ष मात्र या मतदार संघाकडे…

| Updated on: Feb 02, 2023 | 12:27 AM

संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये काढलेल्या तांबेंचा प्रचार अनेक काँग्रेस कार्यकर्ते छुप्या पद्धतीनं करत होते. तर शुभांगी पाटलांना जिंकवून आणण्याची जबाबदारी नाना पटोले, छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडे दिली गेली होती.

विधान परिषदेत पारडं जड कोणाचं..? राज्याचं लक्ष मात्र या मतदार संघाकडे...
Follow us on

मुंबईः राज्यात उद्या पाच विधानपरिषदांचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे नाशिक पदवीधरच्या जागेकडे.काँग्रेसशी दुरावा करुन भाजपच्या जवळ गेलेले सत्यजीत तांबे इथं जिंकणार की मग भाजपची साथ सोडून ठाकरेंचा पाठिंबा मिळवणाऱ्या शुभांगी पाटील बाजी मारणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

नगरची जागा ही मविआबरोबरच भाजपसाठीसुद्धा प्रतिष्ठेची बनली आहे. कारण भाजपनं सत्यजित तांबे यांना पक्षाच्या पातळीवरुन अधिकृत पाठिंबा दिला नसला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन केलं गेलं आहे. त्यामुळे या जागेचा निकाल सत्यजित तांबेंच्या पुढची राजकीय वाटचाल ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला आहे मात्र स्थानिक पातळीवर मविआचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र नव्हतं.

दुसरीकडे संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये काढलेल्या तांबेंचा प्रचार अनेक काँग्रेस कार्यकर्ते छुप्या पद्धतीनं करत होते. तर शुभांगी पाटलांना जिंकवून आणण्याची जबाबदारी नाना पटोले, छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडे दिली गेली होती.

त्यामुळे ही लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. दुसरीकडे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तांबे यांनी विणलेलं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांना प्रचारावेळी महत्वाचं ठरल्याचं दिसून आले.

नाशिक पदवीधरचं नगर जिल्ह्यातच सर्वाधिक मतदान असल्याचा फायदा सत्यजित तांबेंना होण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे पाच जिल्हे येतात.

म्हणजे या पाच जिल्ह्यातल्या नोंदणी केलेले पदवीधर मतदान करतात. पदवीधर मतदारांची एकूण संख्या 2 लाख 62 हजार 731 आहे. तर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यात 55 टक्के मतदार आहेत.

तर एकट्या नगर जिल्ह्यात 45 टक्के. आकडेवारीत सांगायचं झालं तर नाशिकमधल्या पदवीधर मतदारांची संख्या 66 हजार 709,तर जळगावात 33 हजार 544, धुळ्यात 22 हजार 593, नंदुरबारमध्ये 19 हजार 187 तर एकट्या नगर जिल्ह्यात 1 लाख 16 हजार मतदार आहेत. नगरमधला हाच सर्वाधिक पारंपरिक मतदार सत्यजित तांबे स्वतःकडे वळवण्यात यशस्वी होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या ज्या 5 ठिकाणी शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी आता लढत होते आहे. त्यामध्ये मागील वेळी अमरावती पदवीधरमध्ये मविआचे धीरज लिंगाडे विरुद्ध भाजपचे रणजीत पाटील असा सामना आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात मविआचे बाळाराम पाटील विरुद्ध भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंमध्ये लढत रंगणार आहे. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.

एकीकडे काँग्रेसचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि भाजपनं पाठिंबा दिलेले ना. गो. गाणार यांच्यात लढत रंगणार आहे. आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही तिहेरी लढत होईल.

ज्यात एकीकडे राष्ट्रवादीचे विक्रम काळे, दुसरे उमेदवार राष्ट्रवादीचेच बंडखोर प्रदीप साळुंके आणि भाजपच्या किरण पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.