मुंबई : राज्यात महागाईचा (Inflation)भडका उडाला असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवास आणखी महागणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ (fare hike) होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागातील सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ऑटोच्या बेसिक भाड्यात 2 रुपयांची भाडेवाढ होऊ शकते. दोन रुपयांनी भाडे वाढवल्यास ऑटोचे मिनिमम भाडे 21 वरून 23 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टॅक्सीच्या भाड्यात देखील तीन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. या महिन्यात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (MMRTA)ची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान गेल्या मार्च महिन्यातच ऑटो रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढवण्यात आले आहे. ते 18 रुपयांहून यापूर्वीच 21 रुपयांवर पोहोचले आहे. आता त्यामध्ये पुन्हा दोन रुपयांची वाढ केल्यास ते 23 रुपये इतके होणार आहे. तर टॅक्सीचे भाडे देखील 22 रुपयांहून 25 रुपयांवर पोहोचले आहे, आता त्यामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यांच्या भाड्यात लवकरच वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र भाडेवाढ नेमकी किती करण्यात आली हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या भाडेवाढीला मात्र प्रवाशी आणि प्रवाशी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. एकीकडे महागाई वाढत आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा भाडेवाढ झाल्यास त्याचा अतिरिक्त बोजा प्रवाशांवर पडेल. गेल्या मार्च महिन्यातच भाड्यात वाढ करण्यात आली होती. मग आता पुन्हा भाडेवाढ कशासाठी असा सवाल प्रवाशी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र ऑटो आणि टॅक्सी युनियन भाडेवाढीवर जोर देत आहेत. चालू वर्षात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वीच्या दरात वाहन चालवने परवडत नाही. मार्जीनमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेऊन या महिन्यात पुन्हा एकदा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाढल्यास प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.