मुंबई : संपूर्ण देशभरात उष्णतेत वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून राजस्थान, गुजरातबरोबरच महाराष्ट्रातही उष्णतेत वाढ झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मागील आठवड्यात राज्यात काही भागात गारपिटीसह पाऊस कोसळला. त्यानंतर आता उकाड्याने कहर केला आहे. राजधानी मुंबई (Mumbai)तही उकाडा (Heat) वाढला असून तापमानवाढीबरोबरच आर्द्रतेतही वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहराचा पारा थेट 38.9 अंशांवर गेला. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मुंबईच्या तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील किमान आठवडाभर मुंबई-ठाण्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. (Rising temperature in Mumbai, Saturday recorded a temperature of 38.9 degrees)
शनिवारी मुंबईत सांताक्रूझमध्ये 38.9 तर कुलाबा येथे 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले. सांताक्रूझमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांची तर कुलाबा येथे 5 अंशांची वाढ झाली. राज्याच्या तुलनेत मुंबईत उष्णतेने कहर केला आहे. उर्वरित राज्यात तापमान तुलनेत कमी नोंद झाले. मात्र हवेतील आर्द्रतेत वाढ झाली आहे. या आर्द्रतावाढीमुळे मुंबई-ठाण्यात उकाड्यात भयंकर वाढ झाली आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाच्या कडाक्याने मुंबईकर आणि ठाणेकर प्रचंड हैराण झाले आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून तापमानामध्ये सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांची वाढ होत आहे. शनिवारी ही पातळी अचानक 6 अंशांनी वाढली. मुंबईबरोबर ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील पाराही वाढला आहे. हवामान खात्याने मुंबई -ठाण्यासह विदर्भातील अकाेला, वाशिम आणि चंद्रपूरला ‘हीट अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना भर दुपारी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह ठाणे शहराचे तापमान पुढचे आठवडाभर ३७ अंशांच्या घरात राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
शनिवारी मुंबईत सांताक्रूझमध्ये 38.9 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले. नागपूर(सोनेगाव विमानतळ) – 35.9, चंद्रपूर – 36.6, अकोला – 37.3, रत्नागिरी – 36.4, पुणे – 34.6, नाशिक – 33.2 आणि यवतमाळ -35 अंश अशी कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या आठवडाभरात मुंबईचे तापमान मागील काही वर्षांतील विक्रम मोडीत काढू शकते, असे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. (Rising temperature in Mumbai, Saturday recorded a temperature of 38.9 degrees)
इतर बातम्या
1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषीला चार दिवसांची पॅरोल रजा मंजूर; मुलाच्या निकाहासाठी मिळाली मुभा