बावनकुळे, दिवसा ढवळ्या मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नका.. अजितदादांवरून कुणी सुनावलं?

| Updated on: Apr 17, 2023 | 3:47 PM

अजित पवार यांचं भाजपमध्ये स्वागत करणार का, असा सवाल केल्यावर बावनकुळे म्हणाले,आमच्या पक्षात आल्यावर आमच्याच विचारधारेनुसार काम करावं लागतं.

बावनकुळे, दिवसा ढवळ्या मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नका.. अजितदादांवरून कुणी सुनावलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरून सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनीदेखील अजित पवार यांनी विचारसरणी बदलली तर त्यांचं आमच्या पक्षात स्वागत आहे, असं वक्तव्य केलंय. यावरूनही आता नव्या चर्चा सुरु आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवसा ढवळ्या अशी मुंगेरीलालसारखी स्वप्न पाहू नयेत, असा सल्ला देण्यात आलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी हा इशारा दिलाय. २०२४ मध्ये अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावादेखील सचिन खरात यांनी केलाय.

भाजपला काय इशारा?

सचिन खरात यांनी भाजपला इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यामध्ये सतत भारतीय जनता पार्टीचे नेते अजितदादा यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असतात.कारण त्यांना माहीत झाले आहे की, अजितदादा महाराष्ट्र राज्याचे 2024 ला मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम तयार करतात. आता बावनकुळे म्हणाले, ज्याला भाजपची विचारधारा पटली त्याचं स्वागत परंतु बावनकुळे तुमच्या भाजपची विचारधारा ही असमानतेची विचारधारा आहे. अजितदादा जी विचारधारा मानतात ती विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांची समानतेची विचारधारा आहे. त्यामुळे बावनकुळे दिवसाढवळ्या अजित दादांबद्दल मुंगेरीलाल के सपने पाहू नका… असा सल्ला खरात यांनी दिलाय.

बावनकुळे काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आज नवी दिल्लीत आहेत. इतर इकडे अजित पवार यांनी पुण्यातील दोन ठिकाणचे कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. यावरून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला अजित पवारांबद्दल माहिती नाही. अशा जर तरच्या अनेक चर्चा होत असता. पण या चर्चांना जीवनात अर्थ नसतो…

भाजपात स्वागत करणार का?

अजित पवार यांचं भाजपमध्ये स्वागत करणार का, असा सवाल केल्यावर बावनकुळे म्हणाले, देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत आहे. कालपर्यंत कोणत्या विचारधारेत होता, हे माहिती नाही. पण आमच्या पक्षात आल्यावर आमच्याच विचारधारेनुसार काम करावं लागतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा संकल्पा आम्हाला पूर्ण करावा लागोत. त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असाल तर आमचा विरोध नाही..