मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळात कोणाचा नंबर लागणार, याचे आराखडे बांधले जात आहेत. भाजपच्या वाट्याला किती, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) गटाला किती आणि अपक्षांचा वाटा काय, असेल, यावर चर्चा सुरू आहे. त्यात आता भर पडली ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांची. आरपीआयला मंत्रिमंडळात वाटा हवा. महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, यासाठी आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्तेमध्ये आरपीआयला ही वाटा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळावा, ही आमची इच्छा आहे. तशी मागणी आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे. महामंडळातही (Mahamandal) वाटा असावा, अशी मागणीदेखील केली आहे.
शिवसेनेचे दोन भाग पडलेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी शिवसेना. शिंदे गटानं आमच्याकडं दोन- तृतांश आमदार आहेत. त्यामुळं आमचीच खरी शिवसेना असल्याचं म्हणण आहे. रामदास आठवले यावर म्हणाले, एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं, अशी आमची इच्छा आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. पण निवडणूक आयोग काय निर्णय घेत ते पहावे लागेल. शिंदे गटाकडं दोन तृतांश आमदारांची संख्या आहे. काही खासदारही त्यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील बहुसंख्य नगरसेवक शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळं मूळ शिवसेना सावरण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.
रामदास आठवले म्हणाले, शिंदे गटाकडं जास्त आमदार आहेत. शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं पाहिजे. पण, ठाकरे आणि शिंदे दोघेही धनुष्यबाण चिन्हाची मागणी करतील. अशावेळी निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय देईल. तरीही धनुष्यबाण शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळावं, असं रामदास आठवले यांनी इच्छा व्यक्त केली.