डॉ. मिलिंद पराडकर यांच्या ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मोहन भागवत यांनी हिंदू धर्माबाबत विधान केलं. धर्म म्हणजे पूजा, हे खा, ते खाऊ नका नव्हे… तर सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या म्हणजे धर्म… छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठीची संकल्पना आणि प्रेरणा धर्मच आहे. धर्मा विषयीचा तपशील महत्वाचा आहे, असं मोहन भागवत म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. ‘देवाचे कान टोचले’ या शीर्षकाखाली आजच्या सामनाच्या अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. आजच्या या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
हा देश आपल्या करंगळीवर उभा आहे असे सध्याच्या अवतारी पुरुषाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. अवतारी पुरुष ज्यास हात लावतील त्याचा सत्यानाश होताना दिसतोय. अवतारी पुरुषाचे सैन्य हे करबुडवे, अपराधी, देशद्रोही यांनी भरलेले आहे व त्याच सैन्याच्या जोरावर ते सत्य आणि संविधानाच्या विरोधात लढत आहेत.
त्यामुळे धर्म संकटात येताच अवतार घेईन असे भगवंताने सांगितले ते या अवतारी बाबाच्या बाबतीत खरे नाही. रोज खोटे बोलणे, असत्याशी संग करणे हेच त्यांचे कार्य आहे. त्यामुळे सरसंघचालकांनी सांगितले त्याप्रमाणे यांना देव किंवा अवतारी पुरुष मानता येणार नाही. लोकही मानायला तयार नाहीत. भागवतांनी अवतारी बाबाचे कान टोचले हे बरेच झाले, पण होणार काय? ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच घडत आले. सरसंघचालक खरे बोलले हे महत्त्वाचे. अंधभक्तांच्या तंबूत त्यामुळे खळबळ उडाली हेही नसे थोडके!
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या अशा प्रकारचा प्रश्न पूर्वीच्या शालेय प्रश्नपत्रिकेत हमखास असे. कोण कोणास व का म्हणाले? असाही एक प्रश्न त्या वेळी असे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक प्रश्न विचारून लोकांना संदर्भासहित स्पष्टीकरण करायला भाग पाडले आहे. आपण देव झालो आहोत असे परस्पर कुणीच मानू नये. कुणी देव आहेत की नाही हे लोकांना ठरवू दे, असा स्पष्ट विचार मांडून भागवतांनी मोदींच्या तंबूत उंट सोडला आहे.
काही दिवसांपूर्वी भागवतांनी सांगितले होते, एक माणूस सुपरमॅन बनू इच्छितोय. त्यानंतर देवता व परमेश्वर. तो विश्वरूपाचीही आकांक्षा ठेवून आहे, पण भविष्यात काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. सरसंघचालकांच्या या विधानामुळे देशातील अंधभक्त कपाळावर झंडू बाम चोळत बसले असावेत.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचार काळात स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ व्यक्ती घोषित केले होते. म्हणजेच आपण ईश्वराने पाठवलेला पुत्र आहोत असे त्यांनी घोषित केले. त्याआधी अनेक अंधभक्तांनीही मोदी हे विष्णूचे अवतार असून ते अजिंक्य किंवा अपराजित असल्याचे जाहीर केले होते. धर्म ही अफूचीच गोळी असल्याने देशातील अंधभक्तांनी यावर माना डोलवल्या. या देशात संत-महात्म्यांची कमी नाही. पण संत आसाराम, संत राम रहीमसारखे अनेक स्वयंभू अवतार खून, बलात्कार अशा गुह्यांत तुरुंगात गेले व या संतांना संरक्षण देण्याचे काम मोदी राज्यात झाले. तेच मोदी स्वतःला ‘भगवान’ मानतात ही गंमत आहे.