छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाराज, या चोरांना माफी नाही!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. आजच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळय़ास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये . शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे . लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला . मुख्यमंत्री मिंधे , तुम्हाला माफी नाही . सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते , पण तुम्हाला जावेच लागेल . शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा!
नरेंद्र मोदी व त्यांचे भंपक लोक भारताचे हिंदू राष्ट्र बनवायला निघाले आहेत, पण त्यांना सगळय़ांना मिळून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा धड बनवता आला नाही व सिंधुदुर्ग किल्ल्यावर भक्कमपणे उभारता आला नाही. फक्त आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडला आहे.
महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन, बान, शान कोसळून पडली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता. तो इतक्या घिसाडघाईने उभा करू नका असे बजावण्यात आले होते, तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशेब करून पुतळय़ाचे अनावरण केले गेले. तो पुतळा आज राहिलेला नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले.
पंतप्रधानांनी 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळय़ाचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली, पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तिटकारा होता व असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती. कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, बेइमानी, व्यभिचारास मुक्त रान आहे व आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात हे जास्त आहे. अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला.