विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून घमासान सुरु आहे. सरकार आल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल, हे निवडणुकीआधी जाहीर करायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. या सगळ्यावर टीव्ही 9 च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. पवारांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी 3- 4 नावं आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचं नाव नाही, फडणवीस म्हणाले. त्यावर आता संजय राऊतांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे , अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत . काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘ बासुंदी ‘ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते . स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे!
हरयाणा, जम्मू-कश्मीर या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा दोन्ही राज्यांत चालणार नाही यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र व झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरयाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण इथेही मोदी-शहांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत.
मिंध्यांनी गुवाहाटीत रेड्यांचे कितीही बळी दिले तरी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपरिवर्तन होणार नाही, असेच एकंदरीत वातावरण आहे. पुन्हा ज्यांना स्वतःचा चेहरा धड नाही असे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करतात हे गमतीचे आहे. महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला?
फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच मिंधे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वतःला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ”शुक।s। शुक।s” करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तऱहा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे.
फडणवीस हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्याची उठाठेव करतात. पण स्वतःच्या महायुती वगैरेबाबत मात्र ते सांगतात की, ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.’ यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? ‘लाडकी बहीण योजने’च्या श्रेयावरूनही तिघांमध्ये बिघाडी आहे. ती आधी दुरुस्त करा आणि मग इतरांच्या चेहऱ्यावर बोला!