संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, संविधानाच्या खुर्चीवर बसून देशविरोधी कृत्य…

| Updated on: Oct 21, 2024 | 8:03 AM

Sanjay Raut on Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोग झोपलाय काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, संविधानाच्या खुर्चीवर बसून देशविरोधी कृत्य...
संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
Follow us on

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर केलेत. निवडणूक आयोग भाजपचं हस्तक म्हणून काम करत आहे, असं म्हणत आजच्या सामनातून राऊतांनी आरोप केलेत. ‘निवडणूक आयोग झोपलाय काय?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. मतदार यादीत बोगस मतं घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण निवडणूक आयोग कर्तव्य भावनेने काम करण्यापेक्षा भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहे. मतदारांची नावे यादीतून गायब करण्याचे उद्योग सुरू आहेत व त्या अपराधात निवडणूक आयोगाने सामील व्हावे हे देशविघातक कृत्य आहे. आयोग संविधानाच्या खुर्चीवर बसून अशा देशविरोधी कृत्यास पाठबळ देत असेल तर हा देश महान राहिलेला नाही. देशाचे महानपण संपविण्यात न्यायालयांबरोबरच निवडणूक आयोगाने भूमिका बजावली याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत करावी लागेल. निवडणूक आयोग झोपला असेल तर ठीक, पण झोपेचे सोंग घेऊन पडला असेल तर ते सोंग उतरवावे लागेल. प्रश्न देशहिताचा व संविधान रक्षणाचा आहे म्हणून हा प्रपंच.

देशाच्या सरन्यायाधीशांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्याचा आंधळा कार्यक्रम केला आहे. पट्टी काढली तरी आजही न्यायदेवता मोदी-शहांची गुलामच बनून उभी आहे. संवैधानिक पदावर बसलेले न्यायाधीश असोत किंवा इतर लोक, ते सर्व धृतराष्ट्र, गांधारीप्रमाणे डोळय़ांवर कमळछाप मखमली पट्ट्या बांधून बसले आहेत आणि लोकशाहीची हत्या उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहेत. भारताचा निवडणूक आयोगही त्यास अपवाद नाही. आपला निवडणूक आयोग हा निष्पक्ष व स्वतंत्र बाण्याचा राहिलेला नसून बजरंग दल किंवा तथाकथित गोरक्षा समितीप्रमाणे भाजपचा हस्तक म्हणून काम करीत आहे हे लपून राहिलेले नाही.

आता निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपने नवा खेळ सुरू केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने सुमारे 150 मतदारसंघांतील मतदार याद्यांत घोटाळे करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. भाजप लढवत असलेल्या साधारण 150 मतदारसंघांतली मतदार याद्यांची छाननी करून महाविकास आघाडीस पडू शकतील अशी दहा हजार मतदारांची नावे वगळायची व तेवढीच बोगस नावे त्या यादीत समाविष्ट करायची असा कार्यक्रम सुरू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात उघडकीस आलेल्या एका गैरप्रकाराने या गोष्टीला बळकटीच मिळाली आहे.

मतदारांच्या ऑनलाइन नोंदणीदरम्यान सुमारे 6 हजार 853 बोगस नावे या ठिकाणच्या मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न झाला. प्रशासनाने तो आता फोल ठरविला असला तरी मतदार याद्यांत बोगस नावे घुसविण्याचे भाजपचे प्रयत्न कुठल्या स्तरावर सुरू आहेत, हेच या घटनेने समोर आले आहे. एवढेच नव्हे तर छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील मतदारांचे आधारकार्ड जोडून ही हजारो बोगस नावेदेखील महाराष्ट्रातील मतदार यादीत घुसडली जात आहेत. या कामी भाजपने प्रत्येक मतदारसंघानुसार काम करणाऱ्या पगारी टोळ्या नेमल्या व मतदार यादीत हा घोटाळा कसा करायचा यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. महाराष्ट्रात भाजप जिंकेल असे वातावरण नाही. शिवसेनेशी हिमतीने लढण्याची छातीही त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे मतदार याद्या व ईव्हीएमचे घोटाळे करून निवडणूक जिंकण्याचे हे षड्यंत्र सुरू आहे.