जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात काल ग्रेनेड हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांकडून हँड ग्रेनेडद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या ग्रेनेडमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 6 स्थानिक नागरीक जखमी झाले. यावर शिवसेना ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य केलं गेलं आहे. ‘कश्मिरातील वाढते हल्ले, सरकार कुठे आहे?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. कश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढेल काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’, ग्रेनेड हल्ले, गोळीबार व चकमकीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना केंद्रातील मोदी-शाहांच्या सरकारला मात्र याचे काही पडलेले दिसत नाही. जम्मू-कश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांविषयी बैठका घेण्याऐवजी महाराष्ट्र व झारखंडची निवडणूक कशी जिंकता येईल, यावरच सध्या दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. 24 तास निवडणुकांच्याच धबडग्यात हरवलेले केंद्रीय सरकार कश्मिरातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढेल काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा व हरियाणानंतर पुन्हा एकदा ‘इलेक्शन मोड’वर आहेत. महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये येनकेनप्रकारे यश कसे मिळवता येईल, यावर मंथन करण्यातच केंद्रातील महाशक्ती सध्या मश्गुल आहे. त्यामुळेच निवडणुका संपून गेलेल्या जम्मू-कश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात काय घडते आहे, याकडे लक्ष देण्यास मोदी-शहा यांना वेळ मिळत नसावा.
जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांचे लागोपाठ सत्रच सुरू आहे. गेल्या 48 तासांत जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या चार घटना घडल्या. रविवारी दुपारी श्रीनगरच्या टीआरसी मैदानाबाहेर असलेल्या बाजारात अतिरेक्यांनी भयंकर ग्रेनेड हल्ला केला. बाजारात असलेल्या गर्दीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी ठरवून डाव साधला. या ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहेत. यापैकी काही जखमी गंभीर आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या या ताज्या घटनेनंतर सैन्य दलाचे अधिकारी व पोलिसांनी हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू केला असला तरी गर्दीतून गायब झालेल्या अतिरेक्यांना शोधणे आता तसे कठीणच आहे.
जम्मू-कश्मीरची विधानसभा निवडणूक संपल्यापासून या हल्ल्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच दहशतवादी हल्ले कसे काय वाढले, असा प्रश्न नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी आता केला आहे व त्याचे उत्तर केंद्रीय सरकारने द्यायला हवे.
ओमर यांचे सरकार अस्थीर करण्याचे काम एखाद्या एजन्सीला देण्यात आले नाही ना? अशी शंका व्यक्त करताना या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, याचा तपास व्हावा, अशी डॉ. अब्दुल्ला यांची मागणी आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ‘टार्गेट किलिंग’, ग्रेनेड हल्ले, गोळीबार व चकमकीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना केंद्रातील मोदी-शहांच्या सरकारला मात्र याचे काही पडलेले दिसत नाही. दहशतवादी हल्ले का वाढताहेत व ते कसे रोखता येतील, याविषयी सरकार काही करतेय, असे दिसत नाही.