मुंबई : अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन तयार करण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने पाठवलेलं एक रॉकेट आता संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसलं आहे. हे रॉकेट कधीही पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सामनाच्या अग्रलेखातून चीनवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आलीय. ड्रॅगनचे पाप, जगाला ताप, अशा शब्दात सामना अग्रलेखातून चीनवर निशाणा साधलाय. (Saamana Editorial Slam China Over Chinese Rocket Out of Control While Returning To Earth may Fall Back to Earth)
जगावरील आणखी एका चिनी संकटाची टांगती तलवार बनलेले ‘लाँग मार्च 5 बी ‘ रॉकेट हे चीनच्या एकमेव जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेचे पाप आहे. ज्या चिनी अंतरिक्ष स्थानकासाठी हे रॉकेट सोडण्यात आले, त्या अंतरिक्ष स्थानकाला चीनने ‘टियोंगॉन्ग’, म्हणजे ‘स्वर्गातील महाल’ असे नाव दिले आहे. उपमा अलंकार म्हणून हे ठीक असले, तरी त्यासाठी सोडली जाणारी चिनी रॉकेटस् कोसळून ‘जगाचा नरक’ करणार असतील तर कसे व्हायचे? अर्थात, त्याचा विचार करुन चीन सरळमार्गी होईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे. तेव्हा ड्रॅगनचे पाप आणि जगाला ताप सहन करण्याशिवाय तूर्त तरी कुठलाच पर्याय दिसत नाही.
चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे तडाखे जगाला नेहमीच बसत असतात. मागील वर्षभरापासून संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उगमही चीनच्या वुहान शहरातून झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच होत आहे. या विषाणूने बहुतेक देशांची अर्थव्यवस्था तर कोलमडलीच, पण लाखो निरपराधांचे बळीही घेतले आहेत. आता आणखी एक चिनी संकट संपूर्ण जगावर घोंघावत आहे. चीनच्या अवकाश धोरणाचा भाग असलेले ‘लाँग मार्च 5 बी’ हे चीनने अवकाशात सोडलेले रॉकेट आता जगासाठी मोठे संकट ठरले आहे. या रॉकेटवरील नियंत्रण सुटले असल्याने ते जगाच्या कुठल्याही भागावर कोसळू शकते. तब्बल 21 टन वजनाचे हे रॉकेट आहे. साहजिकच हे ज्या भागात कोसळेल, तेथे किती मोठी ‘तबाही’ होईल, याची कल्पनाच करवत नाही.
अवकाश मोहिमांमध्ये अमेरिका, रशियावर मात करण्याची चिनी ड्रगनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातूनच चीन अवकाशात एक अंतराळ स्थानक बांधत आहे. ‘लाँग मार्च 5 बी’ हे प्रक्षेपित केलेले रॉकेट त्याच स्थानकाचे पहिले मॉडल होते. संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना चीन आपला अंतराळ कार्यक्रम कसा पुढे रेटत आहे, असे या रॉकेट लाँचचे कौतुकदेखील झाले, पण आता हेच कौतुक जगासाठी गले की हड्डी बनले आहे. नाही म्हणायला हे रॉकेट कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांत बीजिंग शहराचा समावेश आहे.
तथापि, न्यूयॉर्क, माद्रिद, दक्षिण चिली, वेलिंग्टन आणि न्यूझिलंडच्या भागात हे रॉकेट कोसळेल, असा अवकाश तज्ञांचा कयास आहे. चीनने अवकाशात सोडलेल्या अनियंत्रित रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. गेल्यावर्षी मेमध्येच चिनी रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळले होते. मात्र, ते अटलांटिक महासागरात पडल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. आता मात्र ते मानवी वस्तीवरही कोसळण्याचा धोका असल्याने जगाची चिंता वाढली आहे.
पुन्हा चीनकडून पुढील वर्षभरात अनेक रॉकेटस् अवकाशात सोडली जाणार आहेत. कसेही करून अमेरिका आणि रशियाप्रमाणे चीनला स्वतःचे अंतरिक्ष स्थानक यावर्षी अवकाशात स्थापन करायचे आहे. म्हणजे अंतराळात सोडली जाणारी चिनी रॉकेटस् किमान वर्षभर तरी जगाच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार म्हणून राहणार आहेत.
चीन आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे भौगोलिक विस्तारवादाबरोबरच समुद्र आणि अवकाशातही चिनी ड्रॅगन फूत्कार सोडू लागला आहे. चीनच्या भौगोलिक घुसखोरीचे चटके आणि तडाखे हिंदुस्थान पूर्वीपासूनच अनुभवत आहे. हिंदुस्थानच्या भोवतालची नेपाळ, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका ही राष्ट्रेही चिनी ड्रॅगनने आपल्या पंखाखाली घेतली आहेत. हिंदी महासागरातही चीनने घुसखोरी केलीच आहे. दक्षिण चिनी समुद्रावरही एकहाती प्रभुत्व ठेवण्याचे चिनी प्रयत्न सुरूच आहेत. त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशिया, जपानपासून थेट ऑस्ट्रेलियापर्यंतच्या भागावर नियंत्रण ठेवण्याची ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा आहे.
सुएझ कालव्यावर नियंत्रण ठेवून जागतिक व्यापारावरही चीनला दादागिरी करायची आहे. ‘वन बेल्ट वन रोड’सारख्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नथीतून पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणपासून थेट युरोपपर्यंत चिनी विस्तारवादाचा ‘तीर’ मारण्याचे चिनी मनसुबे आहेत. भौगोलिक महत्त्वाकांक्षा, सागरी कुरघोडी आणि अवकाशावरही प्रभुत्व अशी चीनची तिहेरी विस्तारवादी रणनीती आहे.
(Saamana Editorial Slam China Over Chinese Rocket Out of Control While Returning To Earth may Fall Back to Earth)
हे ही वाचा :
चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?
Bill Melinda Gates divorce : बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट, कारण काय?