मुंबई : भाजपा (BJP Maharashtra) या पक्षाला फक्त धार्मिक राजकारण करायचे असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. मग तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच घरी बसवेल, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (RPI Sachin Kharat) यांनी केली आहे. भाजपाच्या धार्मिक राजकारणावर त्यांनी टीका केली आहे. अमित शाह यांनी काल मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव आणि गणेशदर्शनाचे निमित्त साधून मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा आणि बैठक घेतली. मुंबई महापालिकेवर (BMC) भाजपाची सत्ता मिळवण्यासाठी आणि शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर धार्मिक राजकारणही भाजपाकडून होत आहे. यावरच सचिन खरात यांनी टीका केली आहे.
आपल्या भारत देशात विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत आहेत. त्यामुळे भारत कायम एक राहावा, म्हणून संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून जोडले. तसेच महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी राज्य असूनसुद्धा भाजपा नेते अमित शाह महाराष्ट्र राज्यात धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपा या पक्षाने ध्यानात ठेवावे, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना धार्मिक राजकारण नको आहे. या सर्वांना विकास हवा आहे.
गृहमंत्री अमित शाह काल मुंबईत आले. मात्र त्यांना धार्मिक राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून आले. त्यामुळे खरेच भाजपा या पक्षाला फक्त धार्मिक राजकारण करायचे असेल तर त्यांनी जाहीर करावे. मग तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच घरी बसवेल, असा इशारा देत सचिन खरात यांनी टीका केली आहे. काल अमित शाह मुंबईत आले. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही ते गेले. गणपती दर्शन तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक त्यांनी बोलावली होती.